शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ; गव्हाच्या भावात मोठी वाढ

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ; गव्हाच्या भावात मोठी वाढ. Happy news for farmers; Big increase in wheat prices
सध्या गव्हाच्या भावाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले आहे. त्यात गव्हाची निर्यात वाढली. त्यामुळे दरही वाढले आहेत. भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर गव्हाचे पीठ आणि रव्याच्या निर्यातीवरही बंदी घालण्यात आली. निर्यातीवर बंदी घातल्याने गव्हाचे भाव खाली येतील, असा सरकारचा विश्वास होता. देशात गव्हाचे उत्पादन घटले तरी खरीपात तांदळाचे उत्पादन वाढेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे सरकारने कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गव्हाऐवजी तांदूळ वितरणात वाढ केली.
मात्र, जूनपासून महत्त्वाच्या भात उत्पादक पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी झाले, परिणामी, खरीपमधील भातशेती सुमारे 19 टक्क्यांनी घटली, तर उत्पादन 100 लाख टनांपेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे. तांदूळ उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर पुन्हा एकदा गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. अनेक बाजारात गव्हाने पुन्हा एकदा प्रतिक्विंटल 2,500 रुपयांची पातळी गाठली आहे. गेल्या एका महिन्यात जवळपास सर्वच राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन वाढले आहे. गुजरातमध्ये गव्हाच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. मध्य प्रदेशात गेल्या महिन्यात दर 130 रुपयांनी वाढले आहेत. तर राजस्थानमध्ये 70 रुपयांनी तर उत्तर प्रदेशमध्ये 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. रब्बी गव्हाची आवक होईपर्यंत गव्हाच्या टंचाईमुळे गव्हाचे भाव चढेच राहू शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.