कृषी योजना टीम:
यंदाच्या हंगामात खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने शेतीचा उत्पादन खर्च याद्वारे वाढणार आहे.आधीच शेतमालाला कमी भाव आहेत अशावेळी खताची खरेदी करताना आपण काही विशेष अशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
कारण,खतांचा अति वापर घातक आहे. त्यामुळे एकूण खत खरेदी आणि वापर यामध्ये विशेष लक्ष देण्याचे आवाहन शिवार फाउंंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
त्यांनी केलेल्या आवाहनातील मुद्दे :
खते व बियाणे खरेदी करत असताना कसलीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा.
हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ही सुविधा करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून खते खरेदी करताना ई -पॉस मशिनमधून निघणारी छापील पावती न विसरता मागून घ्यावी व जपून पण ठेवावी.
भविष्यात काही अडचण आल्यास ती पावती गरजेची असते. पावतीवरील छापील किंमत व खताच्या गोणीवरील छापील किंमत याची खात्री करून घ्यावी व मगच दुकानदार यांना पैसे द्यावेत.
नवीन वाढीव दराची पावती देऊन खत मात्र जुनेच देणे हा प्रकार होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्तरावर काळजी घ्यावी.
खतांची दरवाढ झाली किंवा नाही झाली याबद्दल सध्या शेतकरी वर्गात संभ्रम आहे. बाजारात मात्र वाढीव किमतीचा खत साठा उपलब्ध झालेला आहे.
जुना खत साठा भरपूर प्रमाणात शिल्लक आहे तो जुन्या दरानेच विकला जाणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.
कोणतीही तक्रार असल्यास तातडीने तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन शिवार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.