टीम कृषी योजना /Krushi Yojana
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कांदा बियाणे मागच्या वर्षी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करून बँक खात्यात पैसे भरून नोंदणी पूर्ण केली गेली होती. यंदा फुले अॅग्रो मार्ट पोर्टल वर नोंदणी करून त्या क्षणीच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड याद्वारे पैसे भरून नोंदणी पूर्ण करता येईल अशी माहिती बियाणे विभागाचे प्रमुख डॉ.आनंद सोळंके यांनी दिली आहे.कांदा बियाणे यावेळी https://www.phuleagromart.org या वेबसाईटवर 11 जून पासून ते कांदा बियाणे साठा संपे पर्यंत कांदा बियाणे खरेदीची नोंदणी शेतकऱ्यांना करता येणार आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाणांची विक्री कशी करावी असा प्रश्न विद्यापीठाच्या प्रशासनास पडला होता. महात्मा फुले ( राहुरी कृषी ) विद्यापीठाच्या कांदा बियाणाला दरवर्षी प्रचंड मागणी असते. अनेक वेळा बियाणे विक्री पोलीस संरक्षणात करावी लागल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे मागील वर्षी ऑनलाईन पद्धतीने कांदा बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेतला गेला होता. ऑनलाइन नोंदणीस मागील वर्षी काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या.यात सुधारणा करत यावर्षी नोंदणी पद्धतीत आणि संगणक प्रणालीमध्ये सुधारणा करून कोरोना विषाणू संसर्ग टाळण्याचा खबरदारीचा उपाय म्हणून ऑनलाईन पद्धतीनेच कांदा बियाणे विक्री करण्याचा मानस महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी व्यक्त केला आहे.यंदा संगणक प्रणालीत योग्य तो बदल करून येत्या 11 जून पासून ऑनलाईन पद्धतीने कांदा बियाणे विक्रीचा निर्णय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरदराव गडाख यांनी घेतला.