टीम कृषी योजना /krushi Yojana
कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेले नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा (दि ६ ) रविवारी बांगलादेशाला पाठवला गेला.
लासलगाव बाजारसमिती व पिंपळगाव बसवंत बाजारसमिती येथील व्यापाऱ्यांचा कांदा ‘कसबे सुकेणे’ या रेल्वे स्टेशनवरून बांगलादेश व भारतातील इतर राज्यातील महत्वाच्या अश्या बाजार पेठा ( स्टेशन ) ला ५५ रॅकने रवाना करण्यात आला.जवळपास एक ते दीड वर्षा पासून करोना महामारीमुळे कांदा पिकास मागणी नसल्यामुळे म्हणावं तेवढा दर मिळाला नाही. राज्यातील कांद्याची निर्यात सुरू झाल्या मुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
उत्तम दर्जाच्या कांद्यास चांगला दर मिळत असल्याने शेतकरी, व्यापारी दोन्ही वर्ग समाधानी आहेत. चांगल्या क्वालिटी असलेला कांदा सरासरी १९०० ते २२०० रुपये क्विंटलप्रमाणे विकला जात आहे. आपल्या भारत देशात इतर राज्यातील बाजारपेठेसह परदेशामध्ये देखील भारतीय कांद्याला मोठी मागणी असते. चालू वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने यंदा निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज पिंपळगाव बसवंत येथील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याने वर्तविला आहे. रविवारी एका रॅकमध्ये १६ हजार क्विंटल याप्रमाणे ५५ रॅकद्वारे ८ लाख ८० हजार क्विंटल कांदा रेल्वेने पाठवण्यात आला.
अश्याच पध्दतीने कांद्यास मागणी राहिली तर कांद्यास चांगले भाव मिळतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.