श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने दि.१८ मे २०२१ रोजी डाळिंब मृग बहार व्यवस्थापन या विषयी प्रशिक्षण कार्यक्रम कोविड– १९ च्या नियमाला अधीन राहून पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. श्याम सुंदर कौशिक हे होते.
कार्यक्रमामध्ये ऑनलाइन मार्गदर्शन करताना श्री. नंदकिशोर दहातोंडे यांनी डाळिंब लागवडीसाठी जमिनीची निवड, माती परिक्षण, हवामान , जाती, रोपांची निवड, लागवड पद्धती, लागवड अंतर, झाडास वळण, बहार नियोजन, ताण आणि पानगळ, छाटणी, दर्जेदार फळांसाठी फुले व फळे विरळणी, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, फळांची काढणी व प्रतवारी याबद्दल उपस्थित शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले. डाळींबाचे मृग बहार व्यवस्थापन करत असताना बहार प्रक्रिया, बहार केव्हा घ्यावा, पाण्याचा तान देण्याची पद्धत, पाण्याचा तान कसा सोडावा याबाबत उपस्थित असलेल्या शेतकर्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी डाळिंब लागवड शेतकर्यांसाठी कशी फायदेशीर ठरू शकते याविषयी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले तसेच कृषि विज्ञान केंद्रामार्फत चालवल्या जाणार्या विविध उपक्रमांबाबत उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. अश्या उपक्रमात शेतकर्यांनी सहभाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित शेतकर्यांना केले.
या कार्यक्रमासाठी केव्हीके दहिगाव-ने चे सर्व शास्त्रज्ञेतर कर्मचारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केव्हीके चे शास्त्रज्ञ श्री. सचिन बडधे व आभार श्री. प्रकाश हिंगे यांनी मानले.