हवामान

जनावरांचे आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू मग जनावरांचे बाजार का नाही -  शेतकरी व्यापारी यांचा सवाल

टीम कृषी योजना / Krushi Yojana
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढली,आरोग्यसेवा कोलमडून गेली,मृत्यू दर वाढला,अनेक औषधी,बेड मिळणेही दुरापास्त झाले होते.जिल्ह्याचा रिकव्हरी रेट कमी होत होता तर पॉझिटिव्हीटी दर वाढत असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 29 मार्च 2021 पासून अहमदनगर जिल्ह्यातील आठवडे व भाजीपाला बाजार बंद करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती देखील काही काळ बंद ठेवल्या होत्या. कालांतराने कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याचे आदेश देण्यात आले,शेतकऱ्यांना शेत माल विक्री करणे सोईस्कर झाले परंतु त्याच बरोबर शेतीसाठी जोड धंदा म्हणून सांभाळलेले पशुधन,जनावरे विकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकरी व्यापारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील घोडेगाव,काष्टी, लोणी,शेवगाव हे बाजार जनावरांच्या खरेदी विक्री साठी प्रसिद्ध आहेत. नेवासा तालुक्यातील घोडेगावचा जनावरांचा बाजार राज्यात नावाजलेला आहे,या ठिकाणी जातिवंत म्हशी,गाई,बैल त्याच बरोबर शेळ्या मेंढ्यांचा चांगला बाजार या ठिकाणी भरतो.राज्यासह देशभरातून अनेक शेतकरी,व्यापारी या ठिकाणी खरेदी विक्री साठी येत असतात.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली,आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली,रुग्ण संख्या वाढत असताना,बेड,रेमडीसीविर,ऑक्सिजन मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ झाली. जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाने 29 मार्च 2021 पासून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभरातील आठवडे बाजार,जनावरांचे बाजार,कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेतला.
दुसरी लाट ओसरल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू करण्यात आल्या आहेत यामुळे शेती माल विक्री करणे शक्य होत आहे परंतु शेती बरोबर जोडधंदा म्हणून जे पशुधन असते त्यावर शेतकऱ्यांचे अनेक नियोजन असतात. बाजार बंद असल्याने गाई,म्हशी,बैल व शेळी,मेंढी विक्री करता येत नाहीये. समोरासमोर खरेदी विक्री नसल्याने बाजार सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
भाकड जनावरे घ्यायची सांभाळायची व व्यायला आल्यावर विकायची हा व्यवसाय तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. ही जनावरे कुठे विक्री करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.
मध्यंतरी अनेक व्हॉट्सअप ,फेसबुक ग्रुप च्या माध्यमातुन जनावरांचे खरेदी विक्री ग्रुप तयार करण्यात आले होते.या ऑनलाइन खरेदीत अनेक अडचणी येतात,फोटो ,व्हिडीओ अथवा व्हिडीओ कॉल वरून जनावरांची प्रतवारी याचा अंदाज येत नसल्याने खरेदी विक्री अत्यल्प होत आहे. पैशाचा व्यवहार ऑनलाइन फोन पे,गुगल पे द्वारे असल्याने फसवणुकीची शक्यता असल्याने शेतकरी व व्यापारी यांना ऑनलाइन व्यवहार ही संकल्पना फारशी रचलेली नाही.
खरीप मशागती,पेरणी साठी अनेक शेतकरी बैलजोडीला प्रथम प्राधान्य देत असतात बाजार सुरू असताना शेतकरी आपल्या आवडी प्रमाणे बैल जोडी खरेदी करतात,एप्रिल मे महिन्यात तालुक्यातील साखर कारखान्याचा पट्टा पडल्यावर अनेक ऊसतोडणी कामगार त्यांचे बैल विक्री करतात,शेतकऱ्यांची या काळात खरेदी साठी गर्दी असते परंतु बाजार बंद मुळे सर्व नियोजन कोलमडल्याची भावना आहे.
शेळ्या मेंढ्या खरेदी साठी कर्नाटक,हैद्राबाद,आंध्रप्रदेश,पुणे,मुंबई येथून व्यापारी घोडेगाव बाजारात येतात.पहाटे पाच ते 12 वाजेपर्यंत चालणारा शेळी मेंढी बाजारात होणारी मोठी उलाढाल थांबली. शेळी मेंढी पालन करणारे संकटात सापडले आहेत , बोकडांच्या मटणाला मागणी आहे त्यामुळे घरून बोकड विक्री होतात परंतु शेळ्यांना मागणी कमी झाली आहे.
बाजार बंद मुळे शेतकऱ्यांना जनावरांची खरेदी विक्री करण्यास अडचणी येत आहेत. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे हजारो लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्याच बरोबर व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.
घोडेगाव व परिसराचे अर्थचक्र बाजार अवलंबून आहे, तालुक्यातून ,आजूबाजूच्या गावातून परिसरातून शेकडो व्यवसायिक येत असतात. घोडेगाव मधील सर्वच व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे. हा सर्व वर्ग मोठ्या अडचणींचा सामना करत आहे, कोरोनामुळे 2 वर्ष मागे पडला आहे.
घोडेगावच्या या बाजारात दर शुक्रवारी 5 ते 7 कोटी रुपयांची उलाढाल होत असते,घोडेगावची संपूर्ण बाजारपेठेला याचा फायदा होतो,तालुक्यात हा पैसा फिरत असतो या बाजारावर येथील परिसराचे जीवनमान अवलंबून,घोडेगाव चा बाजार परिसराचे अर्थचक्र आहे,हे अर्थचक्र 3 महिन्यांपासून थांबले असल्याने शेकडो शेतकरी व्यापारी ,दलाल असे अनेक वर्गातील लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
महाराष्ट्रात लसीकरण वेग सर्वाधिक आहे,रुग्ण संख्यादेखील कमी झाली आहे,लोकांना आजाराचे गांभीर्य समजले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सारखेच शेतकऱ्यांच्या या बाजारासाठी परवानगी देऊन बाजार सुरू करावेत अशी मागणी शेतकरी,व्यापारी वर्गातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!