टीम कृषी योजना / Krushi Yojana
महाराष्ट्र राज्य सरकारने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केलेल्या योजनेनुसार “शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजना सुरू केली आहे. कुक्कुटपालन शेड बांधकाम या योजनेस अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी बांधवांना या योजनेतून चांगला फायदा होऊ शकेल.
महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या वैयक्तिक लाभाच्या चार योजना मार्फत कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे. या मध्ये तिसरी योजना आहे कुक्कुटपालन शेड बांधकाम योजना. तर आपण आज जाणून घेणार आहोत या योजने संदर्भात सविस्तर माहिती ,योजनेचे स्वरूप व अर्ज कसा व कुठे करावा याबाबत ची सर्व माहिती.
कुक्कुटपालन शेड बांधकाम योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 49000 रुपये अनुदान.
कुक्कुटपालन शेड बांधकाम योजना 2021 : 100 पक्ष्यांकरिता शेड बांधायचे असेल तर 49,760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुपट निधी दिला जाणार आहे. जर एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामीनदारांसह शेडची मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील.
कुक्कुटपालन शेड बांधकाम योजना असा करा अर्ज
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.
सुरवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करा.
त्याखाली ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा.
त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाका.
आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करा.
येथे मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग, गाय- म्हैस गोठ्यांचं कॉंक्रिटीकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला कुक्कुटपालन शेड बांधकाम योजना या कामासमोर बरोबरची खूण करा.
इथे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्य्र रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करा.
तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडा.
लाभार्थींच्या नावे जमीन आहे का, असल्यास “हो’ म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.
रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा.
अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा.
शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करा.
यासोबत मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा.
यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगण्यात येईल.
या नंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल व तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहात की नाही ते नमूद केले जाईल.
तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल; पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
सदर योजने बाबत ची माहिती आवडल्यास ही बातमी तुमच्या मित्रांना व शेतकरी बांधवांना पाठवा. विविध शासकीय योजना,हवामान माहिती,बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या वेब साईट ला भेट देत जा.